सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होताना सन्मानिय श्री. प्रभाकर लोके यांनी व्यक्त केलेले मनोगत…

सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होताना सन्मानिय श्री. प्रभाकर लोके यांनी व्यक्त केलेले मनोगत…

सर्व समाज बांधवांना नमस्कार,
माझ्या निवृत्ती दिनाच्या निमित्ताने तुम्ही मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद!

सेवेच्या शेवटच्या दिवशी मी विचार करीत होतो की, आजपर्यंतची सर्व वर्षे वेगाने सरली. मला आजही माझा भूतकाळ आठवतो. माझा जन्म गाव खांबाळे, कोल्हापुरातील माझी शाळा विद्यानिकेतन, मुंबईतील रूपारेल महाविद्यालय अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्या आठवणी मी जपून ठेवल्या आहेत.

मुंबई पोलीस दलात ३४ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होताना मी आजही आनंदात आहे. सेवा कालावधीत मला महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडून विशेष पदक मिळाले. माझ्या कामाचा विशेष गौरव झाला, मी धन्य झालो!

मुंबई पोलीस दलात पोलिस गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे विभागात मोठ्या हुद्द्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. ह्याच काळात माझ्या नेतृत्वाखाली सिटी लिमोझिन घोटाळा, नॅशनल स्पॉट एक्सचेंज घोटाळा यासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गंभीर प्रकरणांचा तपास यशस्वीपणे झाला. सर्वोच्च न्यायालयात पोलिसांची बाजू मांडण्यासाठी एकदातरी हजर राहणे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांसाठी दुर्मिळ असते; परंतु मला ती संधी १५ वेळा मिळाली. वकील मुकुल रोहतगी सारख्या भारतातील प्रख्यात वकिलांनी माझ्या खटल्यांमध्ये अनेक रिट याचिका दाखल केल्या. शेवटच्या तीन वर्षात मी ३० प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर केली. न्यायालयीन कामकाजासाठी गेले एक वर्ष मी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहत होतो. तेथेही मी अनेक अनुभवातून शिकत आनंद घेत होतो. यावेळी माझ्यासाठी बदलीचे दोन आदेश असूनही माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला त्या जबाबदारीतून मुक्त केले नाही. माझ्यासाठी हा सन्मानच होता. खूप मोठे आणि अतिशय गुंतागुतीचे न्यायालयीन काम माझ्याकडून संपन्न झाले. त्याचे मला समाधान आहे.

माझ्या गावातील, तालुक्यातील लोकांची, मित्रांची तसेच समाजबांधवांची अडचण सोडविण्यासाठी मी मनापासून सदैव प्रयत्न केला.

१९७८ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी एक बॅग, अंगावर शर्ट आणि हाप पॅन्ट अशा अवस्थेत आलो. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या बुक बँकेतून मी ११ वी आणि १२ वीची पुस्तके घेतली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत मला समजल्यावर मी त्या अभ्यासाची सुरुवात केली आणि यशस्वी झालो. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर मी पोलीस क्वार्टरमध्ये राहिलो.

मी पोलिस खात्यातील अनेक अधिका-यांना प्रशिक्षण दिले आहे आणि भविष्यातही पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे वचन सहाय्यक पोलीस आयुक्तांना दिले आहे.

मुळात मी शेतकरी कुटुंबातील असल्याने माझ्या मूळ गावी शेतीसाठी वेळ देण्याची माझी योजना आहे. त्याचप्रमाणे यावर्षीपासून सिंधुदुर्ग येथे लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे मी घेणार आहे.

आजपर्यंतच्या कालावधीत मला माझी पत्नी सौ. पूजा हिचे खूप मोठे सहकार्य मिळाले.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या कार्यकारी समितीने तसेच समाजबांधवांनी माझ्यासारख्या छोट्याश्या पोलीस अधिकाऱ्याला सदैव सन्मान दिला- माझ्यावर विश्वास दाखविला म्हणून मी आत्मविश्वासाने माझे कार्य करीत राहिलो. आता सेवानिवृत्तीनंतर मी समाजाला नक्कीच सहकार्य करीत राहीन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

-प्रभाकर लोके
(सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई)

error: Content is protected !!