कणकवली तालुक्याच्या आयनल मणेरवाडीतील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र श्री.संदेश सूर्यकांत चव्हाण यांची भारतीय पोलीस क्रीडाविभाग, नवी दिल्ली आयोजित पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट टूर्नामेंट्साठी गुजरात सुरत येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघ गुजरात गोवा सीआरपीएफ संघांना हरवून अंतिम फेरीत दाखल झालेला आहे!
खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट परिवारातील सदस्य, खेळाडू, चाहते हितचिंतक यांना खुप अभिमानास्पद बाब! मा.दत्ता मिठबाकर, मा.संदेश चव्हाण ही सिंधुदुर्ग ग्रामीण भागातील क्रिकेटची रत्न भारतीय क्रिकेट क्षेत्रात नवीन नवीन यश पादाक्रांत करत आहेत! हे आम्हा व येणाऱ्या क्रिकेट युवा पिढीतील खेळाडूंना निश्चितच कौतुकास्पद व मार्गदर्शक असे आहे!
मित्रहो….स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की…परिस्थिती कितीही गंभीर असलीतरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल मनात चांगलाच विचार करत आपल्या धैर्याचा पाठलाग करता आला पाहिजे. खरंतर यश ही आपली सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न न करता आपला मार्ग चालत राहीलो तर आपोआप तुमच्या मागे येते. यश देखील असच आहे! सभोवताली कीतीही अंधार असला तरी प्रकाशाच्या दिशेने चालायची तयारी हवी! तो ध्यास हवा! मग यश हे तुमच्या सावलीसारखं सोबत आहेच!
हा सर्व लिखाणाचा अट्टाहास एवढ्यासाठीच की मा. संदेशभाई चव्हाण यांच्या मिळालेल्या यशाची बातमी वाचली आणि त्यांचे जिवाभावाचे मित्र श्री.साई ओटवकर यानां अभिनंदनासाठी फोन केला! संदेश भाई यांच्याबद्दल साई यांना भरभरुन बोलताना वरील सर्व वाक्यांची तंतोतंत जाणीव झाली आणि येथे व्यक्त झालो.
वेगवान गोलंदाजाला साजेशीच शरीरयष्टी, क्रिकेटची आवड, जसनवाला क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या संघातून निवड व सलग चार वर्ष केलेले प्रतिनिधित्व व जिल्ह्यातील नामवंत गांगेश्वर क्रिकेट संघ तरळे, मणेरवाडी क्रिकेट संघ व ज्युनियर काॅलेज,तरळे संघाचा प्रतिभावंत प्रतिस्पर्धी खेळाडू संदेश भाई हा काहीसा माझा त्यांच्या सोबत असलेला परिचय! आपल्या मणेरवाडीच्या माळरानातून आपल्या कुटुंबातील गुरपाळण्याचा शेतीजोड जबाबदारीतून दररोज घरी येत असताना चेंडूच्या आकाराचे मातीतीत दगड उचलून केलेला गोलंदाजीचा सराव आणि त्यावरील निष्ठा व कर्तृत्व… आज ती पायवाट देखील धन्य झाली असेल. त्या काळात संदेश गुरं घेऊन येतोय म्हणजे त्या अगोदर वेगात दगड येईल याची खात्री असलेल्या वाडीतील प्रत्येक आबालवृद्धांच्या भावना धन्य झाल्या असतील. आपल्या मित्राच्या कर्तुत्वाला मुंबईसारखं शहरच न्याय देईल, ह्याची जाणीव असलेले व खर्चाचा विचार न करता त्याची रवानगी बळेबळे मुंबईला पाठविणारे मा. साई ओटवकर व त्याचे सवंगडी आज धन्य झाले असतील. गांगेश्वर क्रिकेट संघाकडून खेळताना त्याची प्रतिभा पाहून कायमच मार्गदर्शन व खंबीरपणे पाठीशी उभे रहाणारे शिवसेनेचे पहिले खासदार स्वर्गीय वामनराव महाडिक यांचे सुपुत्र स्वर्गीय शेखर महाडिक, कै.स्वर्गीय सुनिलजी तळेकर, मुंबई पोलीस विभागाचे सर मा. श्री.दिपक पाटील, गावचे आबालवृद्ध अनेक अदृश्य हितचिंतक धन्य झाले असतील याची खात्रीच आहेच.
खरंतर आयुष्यातील संघर्षांनी संदेशची पाठ जराही सोडली नाही! पण प्रत्येक क्षणाला तो अधिक मजबूत झाला, हे सत्य!
संदेश भाईचा हा क्रिकेट प्रवास पहा…
● सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन U16 व U19 टीम कर्णधार.
● द्रोणाचार्य रव.आचरेकर सरांचे शिष्य व प्रशिक्षक मा.रेगे सरांच मार्गदर्शन घेत कामत क्लब मुंबई कडून क्रिकेट सुरुवात…
● इंग्लंड येथे wembly cricket club कडून काऊंटी स्पर्धेत प्रतिनिधित्व…..
● महाराष्ट्र राज्याच्या U16 व U19 क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व
● MRF फास्ट बॉलिंग ट्रेनिंग सेंटर ला डेनिस लिली सरांकडून विशेष ट्रेनिंग…
● MCA बेंगलोर येथील जगविख्यात गोलंदाज डेनिस लिली सरांचे मार्गदर्शन असलेल्या MRF फाउंडेशन, चेन्नई येथील मुंबई पोलीस क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षक म्हणून सलग वीस वर्ष प्रशिक्षक म्हणून काम…
● मुंबई क्रिकेट असोसिएशन U 19 महेंद्र ट्रॉफी व U23 शालिनी भालेकर वर्षाखालील एमसीए समर कॅम्प..
●कांगा लीग टूर्नामेंट मॅच Observer
●BCCI च्या मुस्ताक अली स्पर्धेसाठी बिहार क्रिकेट संघासाठी लायझेनिंग ऑफीसर…..
● महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाचे प्रशिक्षक…
मित्रहो… सर्व प्रवास स्वपनवत वाटतो ना? यश दिसतं; पण त्या मागे असलेले श्रम हे तेवढेच अनमोल!
संदेश भाई…तुझ्या प्रयत्नांना,गावात गुरं पाळत दिवसा स्वप्नांचा केलेला पाठलाग, तुझ्या मार्गदर्शक, क्रिकेट हितचिंतक व नेहमीच आधार देणाऱ्या मित्र परिवारास मनःपूर्वक सलाम!
भावी काळात तू सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नावं तुझ्या कर्तुत्वातून अजूनही मोठ करशील; ही ईश्वर चरणी प्रार्थना व मनःपूर्वक शुभेच्छा!
-श्री. विजय जोईल (मालवण)