शिक्षणतज्ञ स्वर्गीय हरिश्चंद्र धर्माजी उर्फ एच.डी.गावकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणतज्ञ स्वर्गीय हरिश्चंद्र धर्माजी उर्फ एच.डी.गावकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

विद्ये विना मती गेली।
मती विना निती गेली॥
निती विना गती गेली।
गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले।
एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
शिक्षणाचं माहात्म्य सांगताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी बहुजन समाजाने नेमकं काय करायला पाहिजे? हे सांगून `शिक्षणातूनच मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर होते’ असा संदेश त्यांनी दिला; तो चिरकाल टिकणारा आहे. ह्या ध्येयावर कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंपासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंतच्या सगळ्या थोर विभूतींनी जी शैक्षणिक विकासासाठी क्रांती केली त्या क्रांतीचे एक शिलेदार म्हणून डॉ. रामचंद्र शिरोडकरांचे नाव ह्या महाराष्ट्राच्या ज्ञानियांचा भूमीत अजरामर झाले.
`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज’संस्थेचे आद्यसंस्थापक शिक्षणमहर्षी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांच्या शैक्षणिक कार्याला प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने सर्वोच्च स्तरावर नेणारे त्यांचेच परमशिष्य शिक्षणतज्ञ स्वर्गीय हरिश्चंद्र धर्माजी उर्फ एच.डी.गावकर यांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
१) शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून देशाची ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न पिढी घडावी; यासाठी शिक्षणमहर्षी हरी धर्माजी गांवकर यांनी आयुष्य वेचले.
२) क्षा. म. स. शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.
३) फक्त स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबापुरताच विचार न करता संपूर्ण समाजाचा, नवीन पिढीच्या भवितव्याचा विचार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच हरी धर्माजी गावकर.
४) एच. डी. गांवकर साहेबांचा जन्म ३० जून १९१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला.
५) १९३७ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेसाठी ते मुंबईला आले व त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमधून बीएससी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
६) रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत वैज्ञानिक रसायनशास्त्र या विषयात एमएससीसाठी प्रवेश घेतला.
७) गुजरात येथील खारा घोडा येथील मीठ काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मिठागरातील द्रवातून ‘ब्रोमीन’ हे किमती मूलद्रव्य तयार करणे हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
८) इंग्लंडहून टीचर्स डिप्लोमा करून १९४७ साली ते मायदेशी आले.
९) डॉ. शिरोडकरांनी एच. डी. गांवकर यांची शिक्षणाविषयीची तळमळ व हुशारी पाहून मिठबांव येथील श्री. रामेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून नेमणूक केली. शाळेतील प्रशासनाबरोबरच तेथील शेती-व्यवसाय, मिठागरे, मासेमारीचा व्यवसाय यांचा अभ्यास करून त्यांनी तेथील ग्रामस्थांची संघटना केली. त्यांनी मिठागर कामगारांची सहकारी सोसायटी, मच्छिमार कामगारांची सहकारी संघटना, काथ्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्र, फिरते ग्रामीण वैद्यकीय केंद्र इत्यादी संस्था सुरू केल्या. रामेश्वर हायस्कूलच्या परिसरातील सहा एकर जमीन विकत घेऊन फळबागेची योजना तयार केली.
१०) १९४८ साली डॉ. शिरोडकरांच्या मृत्यूनंतर एच. डी. गांवकर के. एम. एस. शिक्षणसंस्थेचे संचालक झाले.
११) अविश्रांत कष्ट घेऊन संस्थेचा विस्तार केला. परळ येथे शिशुविकास मंदिर, परेल प्रायमरी स्कूल, अध्यापक विद्यालय तसेच मिठबांव येथे ट्रेनिंग कॉलेज, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘सर ससून डेव्हिड वसतिगृह’ यांची उभारणी केली.
१२) एच. डी. गांवकरांनी शिक्षण फक्त पारंपरिक न राहता त्यायोगे स्वत:चा व समाजाचा आर्थिक विकास होणे आवश्यक आहे हा विचार १९७० च्या दशकात मांडला व त्यांच्याच आग्रहामुळे कार्यानुभव हा विषय १९७२ पासून शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला.
१३) त्या आधी १९६५ साली त्यांची निवड भूगोलाची क्रमिक पुस्तके तयार करण्यासाठी झाली व इ. चौथी व पाचवीची भूगोल विषयाची पुस्तके लिहिण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.
१४) अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा यांचे स्थान अनन्यसाधारण असते. नवनाट्य निनाद, के. एम. एस, स्पोर्टस् क्लब अशा संघटना त्यांनी उभारल्या.
१५) डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर हे भव्य नाट्यगृह उभारले. कामगार विभागातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांसाठी हे स्मारक मंदिर वरदान ठरले. असंख्य कलाकारांनी कलेचे प्राथमिक धडे याच डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात गिरविले. तसेच अनेक सामाजिक व राजकीय सभांसाठी हे मुंबईतील प्रमुख स्थान ठरले.
१६) १९६४ साली भारत सरकारने ‘उत्कृष्ट शिक्षक’ हा पुरस्कार देऊन गांवकर सरांच्या कार्याचा गौरव केला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१७) १९६५ साली सेकंडरी एज्युकेशन बोर्डावर गांवकर सरांची निवड झाली. अध्यापक व शासन या विषयावर अभ्यासदौरा करण्यासाठी फुलब्राइट ही शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. प्रगत देशातील व आपल्या देशातील शैक्षणिक स्थितीमधील फरक जाणून घेण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरला.
१८) डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मालवण येथील वायरी येथे श्री रेकोबा माध्यमिक हायस्कूलची स्थापना केली. तसेच ‘शिक्षणातून उत्पादन’ हा नवा प्रयोग सुरू केला.
१९) मुंबई येथे मतिमंद मुलांसाठी के. एम. एस. स्पेशल स्कूलची स्थापना केली तसेच के. एम. एस. व्होकेशनल ज्युनिअर कॉलेजची उभारणी केली. पुस्तकी शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूने व्यवसायाभिमुख विविध अभ्यासक्रमांची निवड केली. ज्याची उपयुक्तता आज आपले पंतप्रधान ‘स्कील इंडिया’द्वारे मांडत आहेत.
२०) कोणताही विषय सृजनतेने शिकविण्याची हातोटी एचडींजवळ होती. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘राहुटी’ किती भव्य कल्पना! इतिहास, भूगोल, समाजशास्त्र व प्रत्येक राज्याची संस्कृती मुलांना शिकविण्यासाठी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले. संपूर्ण भारतात राहुटीचा प्रकल्प राबविण्याची संकल्पना फक्त एच. डी. गांवकरांचीच.
२१) उत्कृष्ट धोरणे, अत्यंत कडक शिस्त, कामाप्रती असलेली निष्ठा व प्रभावी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या एचडींची आपल्याला मिळालेली मोलाची देणगी म्हणजे पाच ‘एच’, अर्थात, हेड, हँड, हार्ट, होप आणि हेल्थ. म्हणजेच बुद्धीचा आणि हस्तकौशल्याचा उपयोग करून आपल्या जीवनात उच्च आकांक्षा ठेवणे आणि सुदृढ शरीराबरोबरच संवेदनशील मनाची साथ देत यशस्वी होणे. असे हे थोर व्यक्तिमत्त्व ७ एप्रिल १९९९ रोजी अनंतात विलिन झाले. अशा व्यक्ती आणि त्यांचे कार्य हे नेहमीच संपूर्ण समाजाला व शिक्षणक्षेत्राला प्रेरित करीत असते.
error: Content is protected !!