सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मुंबईतील परळसारख्या कामगार वस्तीत सर्वसामान्य लोकांच्या मुला-मुलींसाठी शाळा काढून शिक्षणाची सोय करणारे स्वर्गीय डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर हे एक युगपुरुष होऊन गेले. त्यांचे शैक्षणिक कार्य कर्तव्यनिष्ठेने पुढे नेत ते नावारुपाला आणणारे त्यांचे परमशिष्य स्वर्गीय हरिश्चंद्र धर्माजी उर्फ एच.डी.गावकर यांचेही महान कर्तृत्व आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मिठाच्या सत्याग्रहामुळे नावारूपाला आलेल्या आलेल्या कोकणातील शिरोडा या आताच्या सिंधुदुर्ग आणि त्यावेळच्या एकसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील गावामध्ये एका गरीब कुटुंबाच्या पोटी एक द्रष्टा पुरुष जन्माला आला. त्याचं नाव डॉक्टर रामचंद्र काशिनाथ शिरोडकर. लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आपल्या मोठ्या भावाची मदत घेऊन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टर शिरोडकर यांनी आपल्यासारखी परिस्थिती आपल्या इतर समाजबांधवांवर येऊ नये याकरिता आपल्या स्वतःच्या भविष्याची पर्वा न करता केलेले कार्य हे शैक्षणिक क्षेत्राच्या इतिहासात एक सोनेरी पान म्हणावे लागेल.
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या डॉक्टरांना आपल्या उदरनिर्वाहासाठी लहानसहान नोकऱ्या कराव्या लागल्या. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवले. इतकेच नव्हे तर तत्कालीन मॅट्रिक परीक्षेमध्ये उत्तम यश आणि सरकारी शिष्यवृत्ती मिळवून आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली. मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तम यश मिळविल्यामुळे त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. सन १९१८मध्ये ते मुंबई विद्यापीठाची बी.एससी.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांनी एक उच्चांक केला. त्याच वर्षी ते मुंबईतील सोशल सर्व्हिस लीगमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील झाले आणि त्यादरम्यान शहरातील कामगार वस्तीमध्ये पसरलेल्या शीतज्वराच्या भयंकर साथीच्या रुग्णांच्या सुश्रुषेसाठी त्यांनी एक स्वयंसेवक पथकही उभारले.
लोकमान्य टिळकांचे १९२० साली निधन झाले. त्याच दरम्यान डॉक्टरांनी लोकप्रबोधनासाठी श्री शिवाजी नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते आणि त्या माध्यमातून बालविवाह, व्यसनमुक्ती, पैशाची उधळपट्टी, तसेच जुगारबाजी या सामाजिक दोषांविरुध्द प्रचार करण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरांची जून १९२६मध्ये कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. ते पदार्थ विज्ञान या विषयातील तज्ञ तर होतेच, शिवाय ते एक कसलेले कार्यकर्ते देखील होते. त्यामुळे त्यांच्यावर कोल्हापूरमधील व्हिक्टोरिय मराठा वसतिगृहाच्या रेक्टरपदाची जबाबदारीही सोपविली गेली. विशेष म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात प्रकाशात आलेल्या महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांचा त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये समावेश होता. राजाराम कॉलेजमध्ये रुजू होण्यापूर्वी काही काळ डॉक्टर पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होते. त्याकाळी शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन तुटपुंजे होते. डॉ. शिरोडकर यांचे शिक्षण व अंगी असलेली हुशारी पाहाता त्यांना इतरत्र चांगल्या पगाराची मोठ्या पदाची नोकरी मिळविणे सहज शक्य होते. पण तसे असूनही त्यांनी कमी वेतनाचा शिक्षकी पेशा स्वेच्छेने स्वीकारला होता.
त्या महाविद्यालयात प्रथम वर्षाला इंग्रजी, संस्कृत वा अन्य दुसरी भाषा, गणित आणि पदार्थ विज्ञान हे विषय प्रत्येक विद्यार्थाला शिकावेच लागत. राजाराम महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षानंतर विद्यादानाचा पुढचा वर्ग नसल्यामुळे डॉक्टरांना फक्त त्या पहिल्या वर्षाच्या वर्गालाच शिकविता येत असे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला दिवसाला जेमतेम एकच तासिका येई. इतक्या थोड्याशा कामात ते समाधान मानणारे नव्हते. पदार्थ विज्ञानाच्या अभ्यासासाठी बॉटेसनचे भले मोठे जाडे भरडे पुस्तक लावण्यात येत असे. विद्यार्थ्यांना त्या पुस्तकातून अभ्यास करणे जड जात असे. त्यामुळे डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहावरुन पुस्तकाच्या आधारे शंभर-सव्वाशे पानांची एक छोटेखानी तयार करून ती एका प्रकाशकाकडून प्रकाशित करून घेतली होती.
स्वस्थ बसणे डॉ. शिरोडकरांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळे ते उरलेला वेळ प्रयोगशाळेत घालवू लागले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, प्रयोगशाळेचे साहित्य थोडेसे साफसुफ केल्यास इंटर सायन्सच्या वर्गासाठीसुध्दा ते उपयोगात येऊ शकेल. त्यामुळे त्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मदतीस घेऊन प्रयोगशाळेचे ते सर्व साहित्य स्वच्छ केले आणि महाविद्यालयाच्या प्रशासनाला इंटर सायन्सच्या वर्गाला विद्यापीठाची मान्यता घेण्यासाठी अर्ज करण्यास भाग पाडले. अखेर १९२७ सालापासून तो वर्ग महाविद्यालयात सुरु झाला. त्याचे सर्व श्रेय डॉ.शिरोडकर यांनाच जाते. राजाराम महाविद्यालयात शिरोडकर यांची चार वर्षे भराभर निघून गेली. मराठा बोर्डींग कॉलेज आणि इतर सामाजिक चळवळीत शिरोडकर हिरिरीने भाग घेत. इंटर सायन्स नंतर बी.एस्.सी.चे वर्ग आपोआप येणार व त्यामुळे या वर्गांसाठी शिकविण्यासाठी आपले स्वत:चे शिक्षण अपुरे पडेल याची जाणीव त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना झाली. त्यामुळे शिरोडकर यांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जावे असे बेत आखले जाऊ लागले. पण त्यांच्या उत्पन्नाचा विचार करता त्यांना स्वत:च्या उत्पन्नावर इंग्लंडला जाणे कधीच शक्य झाले नसते. संस्थेने त्यांना पगारी रजा मंजूर केली. त्याचवेळी जत संस्थानचे राजे श्रीमान डफळे सरकार यांनी त्यांना एक हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी आपापला एक महिन्याचा पगार डॉक्टरांच्या स्वाधीन केला. जत संस्थानाने त्यांना दिलेल्या या शिष्यवृत्तीमुळे १९३० साली ते इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकले. १९३२ साली लीड्स विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी दिली. त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच विद्यापीठात अणूशास्त्र या विषयावर प्राथमिक संशोधनाचे कामही केले. या संशोधनाचे महत्व जाणून लीडस् विद्यापीठाने डॉ.शिरोडकर यांना पुढील काळात संशोधन चालू ठेवण्यासाठी वार्षिक दोनशे पौंड देऊ केले. परंतु त्याचवेळी राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाळकृष्णा हे दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यांच्या जागी डॉ.शिरोडकर यांची नेमणूक व्हावी अशी त्यांच्या सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी डॉ.शिरोडकर यांना तार करुन परत बोलाविले. परिणामी डॉ.शिरोडकर राजाराम महाविद्यालयात पुन्हा हजर झाले. पण त्यांनी काही कारणांनी ते प्राध्यापकपद स्वीकारले नाही.
मित्रांनी वारंवार तारा केल्यामुळे जरी डॉ.शिरोडकर स्वदेशी परत आले होते, तरी त्यांना संशोधनातच रस होता. तसेच जगातील एक श्रेष्ठ अणुशास्त्रज्ञ होण्याची संधी त्यांना चालून आली होती, ती संधी त्यांच्या परत येण्याने हुकणार होती. त्यामुळे डॉ.शिरोडकर काही काळ निराश झाले. मात्र मायभूमीला परतल्यावर बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि फैलाव करण्यासाठी मुंबई हेच आपले कार्यक्षेत्र करण्याचे ठरविले. त्यांची हुशारी आणि त्यांनी घेतलेल्या शिक्षक पाहता ते भारतात परत येताच त्यांना एखाद्या मोठ्या पगाराची नोकरी मिळणे सहज शक्य होते. मात्र त्यांनी तशा नोकरीकडे पाठ फिरवून आपल्या बांधवांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करणे यावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी बहुजन समाजातील मुलांकरिता शैक्षणिक कार्य करण्याचे व्रत स्वीकारले. १९३४ साली त्यांनी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. पण त्याचवेळी गिरगावातील मध्यमवर्गीय वस्तीमध्ये त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.बाळासाहेब सावंत व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने एका माध्यमिक शाळेची स्थापनाही केली. तसेच त्यांनी १९३५ साली आपल्या समाज बांधवांसाठी- समाज बांधवांच्या उन्नतीसाठी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज या संस्थेची स्थापना केली आणि परळसारख्या कामगार वस्तीमध्ये एका भाड्याच्या छोट्या जागेत एक वसतीगृह सुरु केले. १९३८ साली त्यांनी परळ विभागात के. एम. एस. परेल हायस्कूलची स्थापना केली. या शाळेच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचे प्रमुख म्हणून तत्कालीन मुंबई राज्याचे अर्थमंत्री नामदार ए.पी.लठ्ठे हे उपस्थित होते. जून १९३९ रोजी ही शाळा प्रत्यक्षात सुरू झाली. दरम्यान १९४० मध्ये परिस्थतीमुळे ज्यांना नोकरी करणे भाग आहे, अशा मुलांसाठी परळ या कामगार वस्तीत रात्रशाळा सुरु केली.
सन १९३८ मध्ये त्यांची मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आणि १९४१ मध्ये महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांनी प्राथमिक शाळा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी परळ येथे ट्रेनिंग कॉलेज (अद्यापक विद्यालय) सुरु केले.
१९४५ मध्ये त्यांनी ग्रामीण विभागामध्ये शिक्षण प्रसार व ग्रामीण विकास कार्याचे केंद्र या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव या ठिकाणी एक लहानशी माघ्यमिक शाळा ताब्यात घेतली. नंतर त्यांनी त्या शाळेची जबाबदारी परदेशातून डॉक्टर अंकुश शंकर गावडे यांच्याकडे दिली. त्यांनी एक ग्रामीण भागाला साजेशी गावाशी नाळ जोडणारी व ग्रामीण शेती व फलोत्पादन याचा विचार करुन त्यानुसार शाळेत उपक्रम रावबिले. मुले शाळेत येण्यासाठी डॉक्टर गावडे यांनी साकव व रस्तेही बांधले.
डॉ. शिरोडकर यांनी १९४२ मध्ये चलेजाव चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना अटक होऊन सहा महिन्याचा कारावास भोगावा लागला. त्यानंतर ते राजकारणात अधिक कार्यरत झाले. त्यांची १९४७ साली परळ मतदार संघातून तत्कालीन मुंबई प्रांतविधानसभेत आमदार म्हणून निवड झाली. त्या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी एक निधी चालू केला व निधीद्वारे हरी धर्माजी उर्फ एच.डी.गांवकर यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. हेच एच.डी.गांवकर पुढील काळात डॉ.शिरोडकर यांचे शैक्षणिक कार्यातील वारसदार ठरले.
दरम्यान डॉ.शिरोडकर यांना कॅन्सर रोग झाल्याचे वैद्यकीय निदान झाले. सन १९४८मध्ये त्यांचा हा रोग बळावला आणि त्यांनी १८ डिसेंबर १९४८ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांना अभिवादन.
-शरद राजाराम फाटक,
माजी विद्यार्थी, के.एम.एस.परेल हायस्कूल