क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे -गावडा ) समाजाचा इतिवृत्तांत

क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे -गावडा ) समाजाचा इतिवृत्तांत

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ही एक ज्ञात आहे, ही एक जात आहे व क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई ही एक ज्ञातीसंस्था आहे.

गावडे-गावडा समाजाला `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज’ म्हणून डॉ. शिरोडकरांनी व्यापक ओळख दिली. अनेक जुन्या कागदपत्रांमध्ये गावडे, मीठ गावडे, गावडा अशा अनेक नोंदी आजही आढळतात. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सुद्धा संपूर्ण नावाच्या पुढे ‘गावडा’ हा शब्द बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काळापूर्वी आढळत होता.

आपल्या ज्ञातीचा `गावडे समाज’ हा उल्लेख सर्वजण करीत असले तरी `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज’ हा उल्लेख १९३५ सालापूर्वी म्हणजे डॉ. शिरोडकरांनी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची स्थापना करण्यापूर्वी आढळते. १९११ साली मालवणचे कै. शिवराम विठोजी गांवकर यांनी `क्षात्रकुलोत्पन्न मराठा ग्रामधिकारी विद्योत्तेजक समाज’ नावाची एक संस्था स्थापन केली होती.

त्याप्रमाणे `क्षात्रकुलोत्पन्न मराठा विद्या प्रसारक मंडळ’ नावाची कोचरे गावची संस्थाही डॉ. शिरोडकरांनी स्थापन केलेल्या क्षा. म. समाज संस्थेच्या आधीची आहे.

आणखी ह्या ठिकाणी एका घटनेचा उल्लेख करणे जरूरीचे आहे. डॉ. शिरोडकर शिक्षण संस्थचे पुर्वीचे संचालक एच. डी. गावकर हे मालवणला विद्यार्थी असताना ब्रिटीशाच्या काळात त्यांना कोकण मराठा शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याकाळात अन्य मराठा समाजातील काही लोकांनी त्याबद्दल आक्षेप घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार एच. डी. गावकर हे ज्या समाजातील आहेत तो मराठा समाजच नव्हे. तेव्हा ते या शिष्यवृत्तीस पात्र नाहीत. डॉ. शिरोडकरांना हे कळल्यावर डॉक्टरांनी आपला समाज कसा अस्सल मराठा समाज आहे; याचे ऐतिहासिक पुरावे सादर करून ती शिष्यवृत्ती कायम राखली.

थोडक्यात आपला समाज हा क्षात्रकुलोत्पन्न मराठा आहे; याबद्दल शंका नाही. परंतु अजूनही संशोधन होणे आवश्यक आहे. मिठबांवचे भालचंद्र लोके यांनी ‘लोके’ या आडनावाचा इतिहास मिळविला आहे. त्यानुसार लोके हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथील असून ते जवळ जवळ चारशे वर्षापुर्वी कोकणात आले. असा समाजाचा इतिहास कुणीतरी मिळवून तो पुढील पिढीसाठी जपून ठेवला पाहिजे.

एक गोष्ट नक्की आहे की, सत्तर-ऐंशी वर्षापूर्वी आपला समाज आर्थिक, सामाजिक, राजकिय, शैक्षणिकदृष्ट्या फारस मागासलेला होता. आपल्या समाजाचे लोक त्या काळात काताचा धंदा करीत होते. मिठाच्या आगारात काम करीत होते. त्यावरून आपल्याला ‘मीठ गावडे’ असेही बोलले जात असावे. आजही वेंगुर्ला शिरोड्याच्या बाजूला आपल्या समाजाचे बरेचशे लोके काताचा धंदा करताना आढळतात. तरीही आपल्या समाजातील बहुतांशी आडनावे गावकर (गांवकर) आढळून येतात. ह्याचा अर्थ देवस्थानातील प्रमुख मानकरी हे आपल्या समाजातील असावेत. गावकर हा त्यांंचा बहुमान असावा.

सर्वार्थाने मागावलेल्या अशा या समाजात कमळ उमलावे तसे डॉ. शिरोडकर जन्मास आले. १९१८ साली समाजातील ते पहिले पदवीधर. त्यावेळी ते पहिल्या क्रमांकाने बी. एस. सी. झाले. १९३२ सालात ते इंग्लंडमधील लीड्स विश्वविद्यालयाची पी.एच. डी. ही पदवी घेऊन आले. डॉ. शिरोडकर १९१८ साली समाजातील पहिले पदवीधर होते; याचा अर्थ त्यानंतर पदवीधरांची संख्या वाढत होती; असे नव्हे तर त्यानंतर १९४१ सालापर्यंत समाजाचे अंकुश गावडे, एच. डी. गावकर व जी. के. गावकर हे तिघेजणच पदवीधर झाले. यावरून आपल्या समाजातील शैक्षणिक प्रगती किती धीम्यागतीने होत होती; हे दिसून येते.

त्याकाळी शैक्षणिक पातळी काही मर्यादेपर्यंत होती, तरी त्याही काळी आपल्या समाजातील काही व्यक्ती मुंबईत कर्तबगारी गाजवित होते; असे दिसून येते. मुंबईच्या गिरण्यांमधून बहुतांशी गिरणी कामगार आपले समाजबांधव होते व त्यापैकी काही मोठमोठ्या हुद्यांवर अधिकारी होते. बहुजन समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान होते. ज्यांचे नाव डॉ. शिरोडकरांनी मुंबई महानगरपालिकेत निवडून आल्यावर परळच्या एका मैदानात ‘नरे पार्क’ असे नाव महापालिकेला देण्यास भाग पाडले. ते भिवाजीराव नरे हे ३०-३५ सालच्या दरम्यान एका गिरणीत विव्हींग मास्तर होते. ते थोर समाजसेवक म्हणून ओळखले जायचे. त्यावेळी कामगारांसाठी ‘कामगार हितवर्धक संस्था’ नावाची संस्था काढली. त्याचा उल्लेख कामगार चळवळीच्या इतिहासात आर्वजून केला जातो.

१९१८ साली. डॉ. शिरोडकरांनी कामगारांना पठाणाच्या कर्जातून मुक्त करण्यासाठी क्षात्रकुलोत्पन्न मराठा परस्पर सहकारी पतपेढी स्थापन केली.

१९३५ सालामध्ये क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई या संस्थेची स्थापना करून समाजाच्या भाग्योदयाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हटले पाहिजे. समाजाच्या स्थापनेचा इतिहास कै. जी. के. गावकर यांनी डॉ. शिरोडकरांच्या जीवन परिचयाच्या छोट्याशा पुस्तकात दिला आहे. दि. ११/०८/१९३५ रोजी समाजातील एक नामवंत पुढारी कै. शिवराम विठोजी उर्फ नानासाहेब गांवकर यांच्या निधनानिमित्त परळच्या आर. एम. भट हायस्कुलमध्ये दुखवट्याची सभा घेण्यात आली. तेव्हा `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची एक नमुनेदार संस्था मुंबईत असावी’ हा एकच विचार प्रबळपणे प्रत्येकजण बोलून दाखवू लागला आणि ७ ऑक्टोबर १९३५ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुसरी सभा बोलविण्यात आली. या ऐतिहासिक सभेला `न भुतो न भविष्यती’ एवढा प्रचंड समुदाय हजर होता.
या नवोदित क्षा. म. समाजाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. हाच तो समाजाचा भाग्यदिन! क्षा. म. समाजाच्या क्षितिजावर ज्ञानाचा सुर्योदय झाला. याच ज्ञानसूर्याच्या प्रकाशात वर्षानुवर्षे पसरून राहिलेल्या अज्ञानाचा काळोख नाहीसा होऊन ज्ञानसंपादनाच्या नवचैतन्याने सारा समाज खडबडून जागा झाला.

समाज संस्थेची स्थानपा केल्यावर डॉक्टर साहेबांनी कोणती गोष्ट हेरली असेल; तर मागासलेल्या समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती करावयाची असेल तर प्रथम समाजामध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण केली पाहिजे. म्हणूनच शिक्षण हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर शिरोडकरांनी मुंबईमध्ये कामगार भागात ज्या ठिकाणी समाजाची जास्त वस्ती आहे त्या परळ भागात जागा घेऊन १९३८ मध्ये हायस्कुलच्या इमारतीस सुरुवात केली.
६ जून १९३९ साली ज्ञानाची ज्योत के. एम. एस. परेल हायस्कुल सुरु करून लावली.
त्यानंतर १९४० साली त्याच ठिकाणी नोकरी करूनही शिक्षण घेता यावे म्हणून परळ नाईट हायस्कुलची स्थापना केली.
समाजातील तरुण शिक्षकी पेशात गेल्याशिवाय खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रसार होणे अशक्य आहे. म्हणून १९४१ सालात त्याच इमाारतीत मराठी ट्रेनिंग कॉलेज चालू केले.
आपला समाज ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मोठ्या संस्थेने वसला आहे त्या ठिकाण म्हणजे मिठबाव येथे १९४५ साली मिठबांव एज्यूकेशन सोसायटीने चालविलेली `श्रीरामेश्वर इंग्लिश स्कुल’ ही संस्था ताब्यात घेतली.

तसेच ग्रामीण भागात व्हालंटरी शेट्ये, डोंगरी शाळा, गावडेवाडी रजिस्टर मराठी शाळा, बायजाबाई बोर्डींग, शिरोडे यासारख्या शिक्षण संस्था डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालविल्या गेल्या.

समाज स्थापनेच्या आधी गरजू विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसाय लक्षात घेऊन वसतीगृह चालू केले.

ग्रामीण भागातही समाजाचे शिक्षक पसरले पाहिजेत म्हणून मुंबईप्रमाणे ग्रामीण भागातही ट्रेनिंग कॉलेज काढण्याची कल्पना डॉ. साहेबांच्या मनात होतीच. परंतु त्याच्या हयातीत ते साध्य झाले नाही. डॉक्टरांच्या पश्चात संचालक एच. डी. गावकरांनी १९४९ साली डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण केले. त्याचा परिणाम म्हणून आज मिठबांव येथे समाजाच्या घराघरात शिक्षक दिसून येतात. त्या काळात सुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेत जे प्राथमिक ७०० शिक्षक होते त्यातील बहुसंख्य शिक्षक समाजापैकी होते.

मिठबांव येथे श्री. रामेश्वर हायस्कुलच्या नव्या इमारतीचे बांधकाम चालू असतानाच डॉ. शिरोडकरांनी १९४५ साली श्री. एच. डी. गावकरांची मिठबांव येथे शाळचे प्रिन्सीपॉल म्हणून नेमणूक केली होती. १९४६ मध्ये एच. डी. गावकरांना इंग्लंडमध्ये टी. डी. चा अभ्यासक्रम (टिचर डिप्लोमा) पुरा करून येण्यासाठी पाठविले. इंग्लंड मधून शिक्षण घेऊन आल्याबरोबर त्यांना पुन्हा मिठबांवला संस्थेची जबाबदारी घेण्यास पाठविले. डॉ. शिरोडकरांनी नेमलेल्या वारसाने डॉ. शिरोडकरांचे स्वप्न पुरे करण्यासाठी ध्येयवादाने व त्यागीवृत्तीने स्वत:ला वाहून घेतले. शिक्षण संस्थांचा विस्तार करुन ते समाजाचे ‘मुकुटमणी’ ठरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले नसते तर दलित समाजाची स्थिती अजूनही कशी राहिली असती… ही कल्पनाच केलेली बरी! त्याचप्रमाणे डॉ. शिरोडकर जर आपल्या समाजात जन्मले नसते तर अजूनपर्यंत समाजाची अवस्था काय असली असती… हे सांगण्यासाठी ज्योतिषाची जरूरी नाही.
डॉ. शिरोडकर परदेशातून शिक्षण घेऊन आले. समाजसेवा केली, नगरसेवक झाले, शिक्षण समितीचे अध्यक्ष झाले, समाजाची स्थापना केली, पतपेढी काढली, वसतिगृह काढले, आमदारही झाले. परंतु त्यांना स्वास्थ्य नव्हते. समाजातील अंतर्गत कलह वाढला होता. संस्थेत दुहीची बीजे रोवली होती. मानसिक ताण प्रकृतीची हेडसांड त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. डॉक्टरांना कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने गाठले व त्यातच त्यांचे १८ डिंसेबर १९४८ रोजी अकाली निधन झाले. एका मागासलेल्या समाजाला नवी दिशा देणाऱ्या एका युगपुरुषाचा अंत झाला.

डॉक्टरांच्या अकाली निधनानंतर त्याचे वारस एच. डी. गावकरांनी समाजाची व शिक्षण संस्थांची सूत्रे आपल्या हाती घेतल्यावर आपल्या कुशल नेतृत्वाने संस्था विस्तारल्या व अनेक संस्था निर्माण केल्या. डॉ. शिरोडकरांचे विचार तळागाळापर्यंत नेले. शिक्षण संस्था स्वावलंबी झाल्या पाहिजेत म्हणून मिठबांव येथे शाळेला लागून ६ एकर जमीन घेऊन हापूस कलमांची लागवड करून एक क्रांतीकारक पाऊल एच. डी. गावकरारांनी टाकले.

भविष्यात ज्ञातीसंस्थांनी शिक्षणसंस्था चालविण्यास कोणतीही अडचण येऊ नये व आपले शिक्षण प्रसाराचे काम चालूच रहावे म्हणून एच. डी. गांवकर साहेबांनी डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली; थोडक्यात डॉ. शिरोडकरांचे अपुरे राहिलेले कार्य-समाजाच्या सर्वांगिण विकासाचे कार्य संचालक एच. डी. गांवकर यांनी शेवटपर्यंत चालू ठेवले होते.

आज समाजातर्फे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास होण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. राजकीय पातळीवरसुद्धा आपण थोडीबहूत प्रगती केली. सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार ते खासदार पदापर्यंतही आपण आता पोहोचलो आहोत. आज समाजाचे असंख्य पदवीधर निर्माण झाले आहेत. कलाक्रिडा क्षेत्रातही समाजाचे मोजक्या प्रमाणात का होईना लोक आहेत. सिनेतारका अलका कुबलच्या रूपाने सिनेसृष्टीतही आपला समाज चमकत आहे. अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकारही आहेत. अनेक समाजाचे लोक मोठमोठ्या हुद्यावर आहेत. अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजबांधव भगिनी आहेत. सहकार क्षेत्रातही नावाजलेले मोजके लोक आहेत.

मुंबईसारख्या महानगरीत डॉ. अंकुश गावडेंनी स्थापन केलेली घाटकोपरची शिक्षण संस्था व काळाचौकीत नामदेवराव लोके यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था समाजाला भूषणास्पद असे कार्य करीत आहेत.

समाजाचे कार्य तमाम समाजबांधवांपर्यत पोहोचावे म्हणून बृहन्महाराष्ट्र क्षा. म. समाजाची स्थापना केली गेली. तात्कालीन संचालक एच. डी. गावकर यांनी कार्याचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून मुंबईची शिक्षण संस्थांची जबाबदारी प्रा. सुभाष फाटक यांच्यावर सोपविली व ग्रामीण भागात समाजाच्या संस्था वाढाव्यात म्हणून प्रि. आर. आर. लोकेसाहेब यांच्यावर जबाबदारी सोपविली. प्रि. आर. आर. लोकेसाहेबांनी स्वत:वरील जबाबदारी यशस्वीरित्या पेलली.

समाजबांधवांमध्ये नेतृत्व करण्याचा गुण आपणास दिसून येतो. लढाऊ वृत्ती व आक्रमकता हा समाजापाशी एक महत्वाचा गुण आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा एखादा लढा असो अथवा गिरणी कामगारांचा संपाचा लढा असो; त्यात अग्रक्रमाने समाजबांधवानी भाग घेतला होता.
थोडक्यात आजपर्यंतचे समाजाचे अवलोकन केल्यास डॉ. शिरोडकरांच्या समाज जागृतीमुळे समाज आज विविध क्षेत्रात भरारी मारत असून बहुजन समाजाच्या तुलनेने आपण आज उल्लेखनीय कामगिरी करीत आहोत. यात शंका नाही.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा `काल’ कष्टाचा होता; कारण शुन्यापासून सुरूवात करायची होती.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा `आज’ यशाचा आहे; कारण डॉ. रामचंद्र शिरोडकर आणि एच. डी. गावकर या दोन माहात्म्यांनी समाजाचा पाया घालून कळस चढविला.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा `उद्या’ सुवर्णाप्रमाणे तळपेल; कारण आम्ही सर्व समाजबांधव सर्वच क्षेत्रात डोळसपणे वर्तमानात वावरणार आहोत आणि `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ समाजबांधवांना एकत्रित करून वर्तमानपत्रासारखे व्यासपिठ खुले केले आहे!
(सदर लेखामध्ये अधिक माहिती द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा!)

– नरेंद्र राजाराम हडकर

error: Content is protected !!