साथ देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

साथ देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा!

क्षा. म. समाजाचे आद्यसंस्थापक डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांनी ‘शिवाजी’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते आणि आपल्या लेखनातून अनुचित, गैर, समाज विघातक गोष्टींचा समाचार घेतला व सामाजिक प्रश्न मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, तत्वांना अभिप्रेत असं कार्य केले. ही गोष्ट समाज बांधवांनी सदैव स्मरणात ठेवली पाहिजे; तरच समाज संस्थांचा कारभार पुन्हा एकदा उचित पथावरून सुरू होईल.

समाज माझा, मी समाजाचा! – लेखांक १९ वा
साथ देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

क्षा. म. समाजबांधव भगिनींच्या भेटीस खूप दिवसांनी `समाज माझा, मी समाजाचा!’ या सदराच्या माध्यमातून येत आहोत. मला मनोगत व्यक्त करायचं आहे, ते एक महिन्यापूर्वी म्हणजेच १८ जानेवारी २०२० रोजी झालेल्या `क्षा. म. समाज संघटन’ या वेबसाईटच्या उद्घाटन कार्यक्रमाबद्दल…

`समाज माझा, मी समाजाचा!’ या सदराखाली एकेक लेख प्रसिद्ध होत असताना नवव्या लेखांमध्ये मी `प्रवास तोच, पण उचित गोष्टींच्या संकीर्तनातून…’ ह्या मथळ्याखाली लेख लिहून भविष्यात क्षा. म. समाजातील विधायक, उचित व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा उदोउदो करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार १० वा लेखही `शिरोडकर बिजनेस ग्रुप’ला शुभेच्छा देण्यासाठी लिहिला; परंतु समाजबांधवांच्या समोर वास्तव मांडण्यासाठी लेखमाला कटू असलीतरी सुरूच ठेवावी लागली. तरीही आम्ही क्षा. म. समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी विधायक उपक्रम हाती घेऊन तो १८ जानेवारीला पूर्णत्वास नेला. `क्षा. म. समाज संघटन’ नावाच्या वेबसाईटचे उदघाटन त्या दिवशी करून एक नवीन व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयास आम्ही केला. त्यावेळी आपण सर्व उपस्थित राहून जे आशीर्वाद दिले- मनापासून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मनःपूर्वक आभारी! मी व्यक्तिशः आपल्या सर्वांचा ऋणी आहे.

वेबसाईटच्या निर्मिती मागे कोणता विचार होता? ध्येय कोणते? हे सगळं यापूर्वीच आपल्यासमोर मांडलं आहे. त्याची पुन्हा उजळणी नको. या वेबसाइटची निर्मिती करण्यासाठी आणि उदघाटन कार्यक्रमासाठी ज्यांनी मला साथ दिली, त्यांचे आभार मानताना त्यांचा उल्लेख करावाच लागेल. ज्यांनी मनापासून सहकार्य केले, त्यांना नाव घेतलेले आवडणार नाही; तरीही त्यांची क्षमा मागून मला समाज विधायक कार्यात सहभागी झालेल्यांचे आभार मानावे लागतील.

उद्योगपती आणि समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांनी तन-मन-धन अर्पूण वेबसाईट तयार करण्यापासून उद्घाटन कार्यक्रमापर्यंत ते अगदी घरच्या शुभ कार्याप्रमाणे राबले. त्यांनी मनापासून सर्व नियोजन केले. त्यांचे सर्व कुटुंबीय त्यात सहभागी झाले होते.

फिनिक्स फाऊंडेशनचे श्री. जितेंद्र लोके यांनी कार्यक्रमासाठी पंधरा दिवस आपला वेळ – आपले पैसे खर्च करून जी मेहनत घेतली ती नेहमीच स्मरणात राहील. त्याचप्रमाणे समाजाचे ज्येष्ठ नेते श्री. विजय मुंबरकर, श्री. राकेश कांबळी आणि श्री. सचिन लोके यांनीही तन-मन-धन अर्पण करून वेबसाईट निर्मितीमध्ये साथ दिली. चार्टर्ड अकाऊंट श्री. राम गावडे, श्री. संजय गिरकर, श्री. सुनील जेठे, श्री. शरद घाटये, श्री. संदीप शिर्के, श्री. मनोहर डामरे, श्री. संभाजी बांदकर, सौ. मंगेशी मसुरकर, सुनील घारकर, अशोक घारकर, सत्यविजय चव्हाण, देवानंद चव्हाण यांनी सुद्धा आम्हाला साथ दिली, ती मोलाची होती. त्याचप्रमाणे थोर शास्त्रज्ञ श्री. शरद गावकर, डॉ. प्रमोद लोकेगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. प्रभाकर लोके, व्ही.जे.टी.आय.चे सहाय्यक प्रमुख डॉ. संदीप लोकेगावकर, निवृत्त प्राचार्या सुषमा शेटये, अपना परिवाराच्या सौ. नंदिनी गावडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दत्ता लोके, `क्षा. म. समाज, परळ, मुंबई’चे विश्वस्त अध्यक्ष श्री. आर. डी. फाटक आणि उपाध्यक्ष प्रकाश वाळके, सहचिटणीस सुरभा मुंबरकर, श्री. चंद्रकांत डिचोलकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. भगवान लोके, शुभंकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनय नरे, श्री. सत्यवान लोके, श्री. रघुनाथ चव्हाण, आमचे मित्र श्री. मोहन सावंत आदी अनेक मान्यवर समाजबांधव व भगिनी, आमची मित्रमंडळी, पाहुणे उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! (कोणाचे नाव राहिल्यास क्षमस्व!)

समाजबांधवांच्या कार्यक्रमात अशाप्रकारे सर्वांनी उपस्थित राहून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली. चांगल्या विधायक उचित कार्यक्रमाला समाजबांधव कधीही कुठेही येऊ शकतात? हेच यातून सिद्ध झालं. हीच समाजबांधवांची भावना क्षा. म. समाजाला सुवर्णयुगाकडे घेऊन जाणार आहे.

सदर कार्यक्रम सर्व समाज बांधवांचा आहे म्हणून आम्ही सर्वांना मनापासून आमंत्रण दिले; परंतु काही जबाबदार व्यक्ती ह्या कार्यक्रमापासून मुद्दाम दूर राहिले आणि नको ते फालतू राजकारण करीत बसले. विधायक उचित कार्याला कधीही बाधा-अडथळा येत नाही. कारण अशा कार्याच्या मागे साक्षात परमात्मा उभा असतो; असं कार्य म्हणजेच परमात्म्याचे कार्य असते; असे आम्ही मानतो. भारतीय सनातन हिंदु धर्म हीच शिकवण हजारो वर्ष देत आहे.

समाजकारणात राजकारण करणाऱ्यांना विधायक व उचित कार्याशी काही देणंघेणं नसतं. त्यांना फक्त आपल्या खुर्चीची पडलेली असते. असो. त्यांचा समाचार भविष्यात अवश्य घेऊ! परंतु या निमित्ताने जे मुद्दाम आले नाहीत त्यांचेही आम्ही आभार मानणार आहोत; कारण त्यांची वृत्ती, त्यांची समाजाबद्दलची आस्था आमच्या लक्षात आली.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज अर्थात गावडा-गावडे समाजात जन्माला आलेला कोणीही समाज बांधव `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज’ असं नाव ठेवून संघटना स्थापन करू शकतो, वेबसाईट-वर्तमानपत्र सुरू करू शकतो. ही कोणाची मक्तेदारी नाही. `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज’ नावावर कोणी मालकी सांगू नये. असा कोणी प्रयत्न केल्यास त्यांचा समाचार घेण्यास आम्ही समर्थ आहोत. (काहींनी `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ नावाला हरकत घेतली त्यांच्यासाठी…)

आजपर्यंत `समाज माझा, मी समाजाचा!’ हे लेख व्हॉट्स अ‍ॅप आणि ब्लॉगवर प्रसिद्ध करायचो; परंतु यापुढे हे लेख व्हॉट्स अ‍ॅप, ब्लॉग आणि पाक्षिक `स्टार वृत्त’च्या अंकात-वेबसाईटवर आणि ई-पेपरमध्येही प्रसिद्ध करणार आहोत. कारण आजपर्यंत १८ लेखांवर ज्यांनी खुलासा करणे गरजेचे होते, त्यांनी मुग गिळून गप्प बसण्याचे धोरण अवलंबिले; म्हणूनच आता मी माझ्या वर्तमानपत्रातूनही लेखमाला प्रसिद्ध करणार आहे. कृपया `समाज माझा,मी समाजाचा!’ ह्या सदराखालील लेख पुन्हा वाचा आणि काही चूक असल्यास सांगा; असे मी नेहमीप्रमाणे आजही आवाहन करतो.

सर्वांचे मनःपूर्वक आभार! आपण आता लवकरात लवकर भेटू नवीन लेखाच्या माध्यमातून! असाच लोभ असावा, समाजाच्या भल्यासाठी! प्रतिक्रियांचं नेहमीप्रमाणे स्वागत!

(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर

error: Content is protected !!