डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची ७७ वी पुण्यतिथी निमित्त विशेष लेख
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणच्या मातीपासून ते मुंबईतील परळसारख्या कामगार वस्त्यांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवणारे, बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी आयुष्य वेचणारे स्वर्गीय डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर हे खऱ्या अर्थाने एक युगपुरुष होते. आज त्यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याला कृतज्ञ स्मरणाने अभिवादन करणे ही काळाची गरज आहे.
शिरोडा (ता. वेंगुर्ला) या तत्कालीन एकसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील गावात, एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. शिरोडकर यांच्या आयुष्याची सुरुवात संघर्षातून झाली. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठ्या भावाच्या आधारावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. स्वतः भोगलेल्या दारिद्र्याचे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी त्यांनी स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याची पर्वा न करता शिक्षणालाच आपले जीवनकार्य मानले.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या डॉ. शिरोडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवले. लहानसहान नोकऱ्या करत त्यांनी मॅट्रिक परीक्षेत उत्तम यश मिळवले व सरकारी शिष्यवृत्ती प्राप्त केली. सन १९१८ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.एससी. परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उच्चांक प्रस्थापित केला. त्याच काळात त्यांनी सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून कामगार वस्त्यांमधील साथीच्या आजारात स्वयंसेवक म्हणून अतुलनीय सेवा बजावली.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांनी ‘श्री शिवाजी’ हे वर्तमानपत्र सुरू करून समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले. बालविवाह, व्यसनाधीनता, जुगारबाजी यांसारख्या सामाजिक दोषांविरोधात त्यांनी निर्भीडपणे लेखणी चालवली.
सन १९२६ मध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी केवळ अध्यापनावर न थांबता महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्तारासाठी पुढाकार घेतला. प्रयोगशाळा सुधारणा, इंटर सायन्स वर्ग सुरू करण्यासाठी विद्यापीठाची मान्यता मिळवणे, विद्यार्थ्यांसाठी सोपी अभ्यासपुस्तके तयार करणे—या सर्व उपक्रमांतून त्यांची द्रष्टेपणाची झलक दिसून येते.
१९३० साली इंग्लंडला जाऊन त्यांनी लीड्स विद्यापीठातून पीएचडी मिळवली. अणुशास्त्र क्षेत्रात जागतिक पातळीवर संशोधनाची संधी असूनही त्यांनी मायभूमीची हाक ओळखून ती संधी नाकारली आणि भारतात परत येऊन बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिले.
मुंबईत त्यांनी परळ, गिरगाव परिसरात माध्यमिक शाळा, वसतिगृहे, रात्रशाळा सुरू केल्या. के. एम. एस. परेल हायस्कूल ही त्यांची शिक्षणनिष्ठेची जिवंत साक्ष आहे. नगरसेवक व मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षक प्रशिक्षण संस्था सुरू करून प्राथमिक शिक्षणाला बळकटी दिली.
ग्रामीण भागातही शिक्षण पोहोचावे या ध्यासातून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथे शाळा उभारून ग्रामीण विकासाला शिक्षणाची जोड दिली. ‘चलेजाव’ चळवळीत सहभाग घेतल्यामुळे कारावास भोगतानाही त्यांची समाजनिष्ठा ढळली नाही.
१९४७ साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत करणारा निधी उभारला. याच माध्यमातून स्वर्गीय हरिश्चंद्र धर्माजी उर्फ एच. डी. गावकर यांना इंग्लंडला पाठवले आणि पुढील काळात तेच त्यांच्या शैक्षणिक कार्याचे समर्थ वारसदार ठरले.
कॅन्सरशी झुंज देत असताना देखील समाजकार्यापासून दूर न गेलेले डॉ. शिरोडकर १८ डिसेंबर १९४८ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांनी पेटवलेला शिक्षणाचा दीप आजही हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवत आहे.
डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर हे केवळ एक शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानणारे द्रष्टे युगपुरुष होते. त्यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
-नरेंद्र हडकर
