आज एक दुःखद बातमी आली; आपले समाज बांधव तुकाराम लोके यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास परमात्म्याच्या चरणी चिरशांती मिळो आणि ह्या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो; ही देवाकडे प्रार्थना!
तुकाराम लोके हे कवी मनाचे चांगले लेखक! त्यांचे वाचन आणि अभ्यास दांडगा! क्षा. म. समाजाप्रती त्यांचे प्रेम वाखाणण्याजोगे! क्षा. म. समाजाचे आद्यसंस्थापक डॉ. शिरोडकर यांच्याबद्दल त्यांची अपार श्रद्धा! डॉ. शिरोडकरांना तुकाराम लोकेंनी आपली सद्गुरु स्थानी- देवाच्या स्थानी मानलं आणि तशी निष्ठा त्यांनी ठेवली. डॉ. शिरोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांनी लिहिलेला लेख वाचल्यानंतर आपणास समजून येईल की, त्याच्या हृदयात डॉ. शिरोडकरांचे स्थान किती दृढ होतं ते!
तुकाराम लोके १७/१२/२०१९ रोजी लिहिलेल्या आपल्या लेखात म्हणतात,
परमेश्वराला आपल्या समाजबांधवासाठी काहीतरी करायचे होते म्हणून डॉ.शिरोडकरांचा जन्म! १८ डिसेबर हा दिवस आपल्या समाजबांधवांसाठी महत्वाचा दिवस! काही समाजबांधव या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात; कारण या दिवशी असते, डॉ. शिरोडकर पुण्यतिथी!
या दिवशी क्षा.म. समाज व्यवस्थापनाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते! त्या निमित्ताने समाजबांधव आपल्या मनमंदीरात पुजत असलेल्या आपल्या समाजाच्या शिल्पकाराच्या प्रतिमेसमोर किवा पुतळ्यासमोर माथा टेकवतात, नतमस्तक होतात आणि म्हणतात, `तू बीज पेरले, रोपटे आभाळू गेले!’ आपल्या समाजाच्याआपल्या राजा प्रती ही भावना समाजबांधव खूप काळजीने जपत असतो! काय झाले असते जर डॉक्टर जन्मले नसते तर? असा विचार समाजबांधव करत असतो!
डॉ. शिरोडकर म्हणजे महान शक्तीचा जन्म! त्यांचा पुजनीय पुतळा किंवा तसबीर पाहील्यावर त्यात विलक्षण अशी भाववस्था असते. ते रुप पहातच रहावे असे वाटते. ते रुप बोलू लागते आणि आपले आचरण बिघडले आहे का? अशा प्रकारचा धाक मनात येतो. त्याच्या मुखातून निघणारा दम आपल्या कानावर आदळतो. आपले हात आपोआप कानाजवळ जातात, ओठात शब्द येतात, “क्षमा करावी, कृपा असावी या दासावर!” ही अवस्था काही समाजबांधवांची आणि भगिनींची असते. सदगुरू स्वरुप डॉ. शिरोडकर म्हणजे एक तपस्वी होते. त्याचबरोबर ते चांगले अभ्यासक होते, संशोधक होते, चिकित्सक होते. आपल्यासाठी ते परब्रह्म होते. आपल्यावाणीने वर्णन करण्यापलिकडचे होते. त्यांची मनानेही कल्पना करणे कठीण जाईल. शिक्षणाच्या प्राप्तीसाठी या सदगुरुने ‘शिक्षण’ हीच साधना सांगितली. ही साधना समाजातले विचारवंत आपल्या विचारकौशल्याने मांडत असतात; त्यातले पुढे पुढे जाण्याचे मंत्र सांगतात. आपण जे काय करतो ते डॉक्टर शिरोडकर करुन घेतात असा मौलिक विचार ते देतात.
ज्याचा आपल्याशी संबंध असतो त्याचे भले व्हावे असे आपल्याला वाटते; पण आपल्या समाजातील सर्वांचे भले व्हावे! डॉ. शिरोडकरांचा समाजाबाबतचा द्रष्टा विचार आजही प्रेरणादायी वाटतो. त्यांची समाजाबाबतची नैतिक मुल्ये आजही बहुमोल वाटतात.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले…. आमच्या काही पुर्व पुण्याईमुळेच आम्हाला डॉ शिरोकरांच्या समाजात जन्म मिळाला. त्यांच्या स्मारकाच्या सानिध्यात वावरण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा योग लाभला. ‘आम्ही समाजबांधव ‘ हे नाते निर्माण झाले. आमची परंपरा ही `शिरोडकर परंपरा’ आहे; असे वाटू लागले.
तुम्हीच बांधलेल्या मंदीरी तुम्हीच आमचे देव
तुमचे भक्त आम्ही सारे घेऊ तुमचे नाव!
आपल्याला डॉ. शिरोडकर हवे, त्यांचे विचार हवे; असे आपण म्हणतो किंवा मानतो! डॉक्टरांचे प्रेम लाभले, आपले त्यांच्यावर प्रेम बसले; तर आपला जीव त्याच्यासाठी प्रेमरुप होईल! असे प्रेम डॉ शिरोडकरमय झाले तर सर्व समाजबांधव एकदिलाने वागतील. समाजाचे व्यवस्थापन त्यांनी केले. असे माझे डॉ. शिरोडकर समाज संस्थापक होते. तर आज समाजसुधारक म्हणून विविध रुपात वावरत आहेत. डॉ शिरोडकर सर्वांच्या हृदयात आहेत.
ते तळागाळातल्या समाजबांधवांपर्यत जायला हवेत. याकरिता डॉ. शिरोडकर यांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम गावागावात-वाडीवाडीत व्हायला हवेत. डॉ. शिरोडकरांचे विचार घराघरात पोहोचायला हवेत. त्यादिवशी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण समाज मंदिरात जायला पाहिजे. योग: कर्मसु कौशलम्!
तुकाराम लोके यांनी डॉ. शिरोडकर यांच्याबद्दल मांडलेले विचार खरोखरच मोलाचे आहेत. ते आपण जपले पाहिजेत; तरच तुकाराम लोके यांना खरी श्रद्धांजली वाहिली गेली असं म्हणता येईल. क्षा. म. समाज बांधव- भगिनी समाज संस्थेबद्दल फारशी आस्था दाखवीत नाही. समाजात पदांसाठी नेतेगिरी करणाऱ्यांचा तो पराभव आहे. पण तुकाराम लोके यांच्यासारखा एक सामान्य समाज बांधव मात्र असे समाजाबद्दल आणि डॉ. शिरोडकरांबद्दल निःस्वार्थी प्रेम व्यक्त करतो आणि तसे जगतो. अशा समाज बांधवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जेव्हा लेख लिहावा; लागतो तेव्हा खूप दुःख होते. अशा व्यक्तींच्या जाण्याने खऱ्याअर्थाने समाजाचे नुकसान होते. तुकाराम लोके यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली!
– नरेंद्र हडकर