प्रा. डी. बी. ढोलम- एका अभ्यासू नेतृत्वाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…

प्रा. डी. बी. ढोलम- एका अभ्यासू नेतृत्वाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…

सिंधुदुर्ग जिल्हयातीलच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते प्रा. डी. बी.ढोलम यांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक समृध्द जीवनप्रवास होता. जीवनाच्या विविध अंगामधून सरांच्या व्यक्तिमत्वाचा जो आविष्कार झाला आहे, तो पाहता त्यांचा पिंड हा मुळी कार्यकर्त्याचा होता हे दिसून येते. जीवनाचा नम्र उपासक बनून सरांनी आपल्या जीवनाची समिधा सहकार व शिक्षणासाठी समर्पित केली, असेच म्हणावे लागेल.

प्राथमिक शिक्षक ते महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष असा थक्क करून टाकणारा सरांचा जीवनप्रवास होता. अनेक अडचणीशी सामना करत शिक्षण पूर्ण करुन सरांनी प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात केली. त्यांचा पिंडच अभ्यासू वृत्तीचा असल्याने प्राथमिक शिक्षकाची नोकरी करतच पदवी संपादन केली. मध्यंतरीच्या काळातील राष्ट्रसेवादलाचे सत्कार त्यांच्या जीवनावर प्रभाव करून गेले.

शिक्षण व सहकार ही त्यांची दाेन आवडती क्षेत्रे. प्राथमिक, हायस्कूल शिक्षक, हायस्कूल मुख्याध्यापक, डी.एड्. कॉलेजचे संस्थापक, शिक्षण संस्थाचालक, संस्थेचे अध्यक्ष या विविध नात्याने शिक्षण क्षेत्रातील त्यांचा वावर अधिकारपणाचा होता. शिक्षक असणे ही माझ्या जीवनातील महत्वाची घटना आहे, असे ते मानायचे. प्रथमदर्शनीच विद्यार्थावर छाप टाकणारे दरारायुक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सहकारी शिक्षकांशी मात्र ते मित्रत्वाच्या नात्याने वागायचे. शिक्षकांचा त्यांनी कधीही अपमान केला नाही. शिक्षकांचे ज्ञान हे नित्य, चौफेर व अद्ययावत असावे, याकडे त्यांचा कटाक्ष असे. वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीयच होती.

सहकार हा सरांचा श्वासच होता. वराड विकास सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या सहकारातील कारकीर्दीला सुरुवात झाली. स्व. भाईसाहेब सावंत यांच्या संपर्कात आल्यावर त्यांची सहकारातील रुची अधिकच वाढत गेली. वराड सोसायटीचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष अशी सरांनी सहकारातील अनेक पदे भूषविली. परंतु ती मानाची पदे कधीही मिरवली नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून सहकारी संस्थांचा अभ्यास करणे, अडचणी आल्यास संबंधित पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यावर निर्णय घेणे, यावर त्यांचा विशेष कटाक्ष असे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यांनी कधी आततायीपणा केला नाही. अविचाराने निर्णय घेतला नाही.

सिंधुदुर्ग बँक आर्थिकदृष्टया सुस्थितीत व प्रगतीपथावर आणण्यात स्वर्गीय शिवरामभाऊ जाधव यांच्याबरोबरीने ढोलम सर यांचाही सिंहाचा वाटा आहे. शिवरामभाऊ जाधव आणि ढोलम सरांनी सहकार क्षेत्राला सिंधुदुर्ग जिल्हयात प्रतिष्ठा मिळवून दिली. महाराष्ट्रात इतरत्र सहकार क्षेत्र बदनाम होत असताना सिंधुदुर्गात मात्र सहकार क्षेत्र चांगल्याप्रकारे रुजत होते. त्यांचे आधारस्तंभ होते, सहकारमहर्षी ढोलम सर!

काँग्रेसच्या विचारसरणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या विषयी त्यांच्या मनात अतीव आदर होता. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नव्वदीच्या दशकात काम केले. परंतु राजकारणात मात्र ते फारसे रमले नाहीत. राजकारणात काम करताना आवश्यक असणारी प्रकृती त्यांची नव्हती, असेच म्हणावे लागेल.

माझे ढोलम सरांशी जिव्हाळ्याचे नाते होते. मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो. एकदा वक्तृत्व स्पर्धेत मी जवाहरलाल नेहरू यांचेविषयी चुकीचे विधान केले. ढोलम सरानी अभ्यासूपणाने माझे विधान चुकीचे आहे हे दाखवून दिले. (अर्थात नंतरच्या काळात जवाहरलाल नेहरू हे आभाळाएवढे व्यक्तिमत्व आहे, याची ओळख झाली.)

नंतरच्या काळात राजकीय मतभिन्नता असूनही आमचे स्नेहबंध कायमच जुळलेले होते. ते सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष असताना आम्ही आयोजित केलेल्या राष्ट्रसेवादलाच्या शिबीराला बँकेमार्फत आर्थिक साहाय्य करून समारोपाला स्वतः सर उपस्थित राहिले होते. साने गुरुजी कथामालेचे प्रकाशभाई मोहाडीकर गुरूजी यांची साने गुरुजी विचार प्रचार यात्रा कट्टा येथे आली असता साऱ्याना आपल्या घरी जेवायला नेले होते. ज्ञानेश देऊलकर सुद्धा त्यावेळी जेवायला होते.

माझी मुलगी मृणाल एस.एस.सी.ला पास झाल्यावर पेढे देण्यासाठी सराकडे गेलो, त्यावेळी सर आजारी होते. सरांच्या मुलीने बेबीने मृणालला ९५ टक्के गुण मिळालेत हे सांगितल्यावर “दीपक सुद्धा हुषार होता. एसएससीला तो सुध्दा नागरिकशास्त्र विषयात राज्यात दुसरा होता.” हे तिला सांगितले. आयुष्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्याचे गुण लक्षात ठेवणारा शिक्षक विरळाच!!

आज सरांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन !!

 

दीपक भोगटे

error: Content is protected !!