प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते दत्ता लोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते दत्ता लोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

काल सायंकाळी अतिशय दुःखद बातमी आली; सन्मानिय दत्ता लोके यांच्या निधनाची! एक चांगला मार्गदर्शक गेला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लेख लिहावा लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्हाला एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं; पण राहून गेलं. जानेवारीमध्ये क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन समाज अर्थात kmsamaj.org ह्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यासाठी वेळातवेळ काढून ते आवर्जून उपस्थित होते. त्यादिवशी दूरदर्शनसाठी महत्त्वाचे वृत्तांकन करून ते थेट कार्यक्रमासाठी घाईघाईत पोहोचले होते. आम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या. आम्हीसुद्धा त्यांचं मनापासून स्वागत केलं. त्यादरम्यान त्यांनी आपले मनोगत आमच्याकडे व्यक्त केलं; त्या मनोगतामध्ये काय होतं? तर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था खूप मोठी व्हावी आणि त्यासाठी प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे; सर्वांनी संघटितरीत्या कार्य केले पाहिजे; जेणेकरून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज सर्वांगिण विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचेल.

समाजाबद्दलची आपुलकी त्याच्या हृदयात होती, समाजाबद्दल शुद्ध प्रेम त्याच्या मनात होतं, समाज निरंतर प्रगतीच्या दिशेने पुढे पुढे जावा हा विचार त्यांच्या बुद्धीत होता आणि ही आपुलकी- हे प्रेम- हा विचार कृतीत आणण्यासाठी त्यांची सदैव धडपड असायची. अतिशय स्पष्टपणे बोलणारा असा हा मनुष्य आम्हाला मात्र आवडायचा; कारण दत्ता लोके सत्य मांडायचे, वास्तव बोलायचे. भविष्यामध्ये समाज खूप मोठा झाला पाहिजे; त्या दृष्टिकोनातून त्यांनी समाजासाठी वेळ द्यावा, असं माझं म्हणणं होतं आणि त्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. ते गेल्याने समाजाचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे.

दत्ता लोके नेहमीच होतकरू तरुणांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करायचे. मला ते नेहमी म्हणायचे, `दूरदर्शनमध्ये ये आणि तिथे खूप संधी आहेत आणि चांगल्या पत्रकारांची तिथे उणीव आहे, ती तू भरून काढशील. ‘ माझ्याबद्दल त्यांनी दाखविलेल्या ह्या विश्वासाने माझं मन भरून यायचं. आज जातो.. उद्या जातो… असे म्हणायचो! मार्च महिन्यानंतर जायचे नक्की केले होते; पण लॉकडाऊन वाढत वाढत गेलं आणि त्यांना भेटायचं राहून गेलं आणि कालच्या बातमीने मन सुन्न झालं.

दत्ता लोके यांनी आपल्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई संस्थेत अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून काम केलं. त्यावेळी त्यांच्याकडील प्रामाणिकपणा समाजाबद्दलची बांधिलकी त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी एका सहकाऱ्यांसह लढाई करण्याचा प्रयत्न केला. (त्या सहकाऱ्याचं नाव आता सांगणे उचित नाही.) त्या दोघांनी तात्कालीन संचालकांना सडेतोड प्रश्न विचारले. त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. हिशोबातील अनुचित प्रकार लक्षात आणून दिले आणि हे आम्ही समाजाला सांगू असं ठामपणे जाहीर केले. तत्कालीन संचालकांनी अन्य अंतर्गत हिशेब तपासणीसांना हाताशी धरून आपला कार्यभाग साधून घेतला. असो; सांगण्याचे तात्पर्य काय? दत्ता लोके हे प्रामाणिक होते, कार्यक्षम होते, चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची मानसिकता होती आणि विशेष म्हणजे समाजावर त्यांचं खरं प्रेम होतं. समाजाने खूप मोठी प्रगती करावी, समाजाच्या खूप मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था असाव्यात; हे त्यांचे स्वप्न होतं. नुसतं स्वप्न नव्हतं तर त्या स्वप्नांसाठी काम करण्याची त्यांची तयारी होती. नक्कीच ते भविष्यात तिथे काम करताना आम्हाला दिसणार होते. पण दुर्दैवाने आता ते शक्य नाही; ह्याचे दुःख वाटते.

दत्ता लोके यांनी शिवाजी शिक्षण संस्था घाटकोपर संस्थेतही उपाध्यक्ष म्हणून यशस्वी काम केलेले आहे. सह्याद्री वाहिनीवर ते महत्वाचे पदावर काम करीत होते. त्यांचे अनेक तज्ञ, विद्वान मान्यवरांशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने आम्हा समाजबांधवांना दुःख आहेच. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळा (https://kmsamaj.org) मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्याला परमात्म्याच्या चरणी सुशांती मिळो; ही आदिमातेच्या चरणी प्रार्थना!

-नरेंद्र हडकर

error: Content is protected !!