जन्मदिनानिमित्त स्वर्गीय मोहन लोकेगांवकर यांना विनम्र अभिवादन!

जन्मदिनानिमित्त स्वर्गीय मोहन लोकेगांवकर यांना विनम्र अभिवादन!

क्षात्रकुल्लोत्पन्न मराठा समाजाचे नेते, गावडा – गावडे समन्यव समितीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक
स्वर्गीय मोहन विठोबा लोकेगांवकर यांचा आज जन्मदिन! त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

कै. मोहन लोकेगावकर यांचे सामाजिक – राजकीय कणखर आणि समर्थ नेतृत्व मुंबईत शहरात बहरले. जनतेच्या प्रश्नांना थेट भिडण्याच्या वृत्तीने ते लोकप्रिय झाले. सामान्यांचे अनेक छोटे मोठे प्रश्न त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली सहजपणे सोडविले. त्यांची जनतेशी जोडलेली नाळ त्यांचं राजकीय सामर्थ्य वाढविणारी होती. शिवसेना पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते सांताक्रुज (प.), वार्ड क्रमांक ९७ चे नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (उपनगरे) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले. त्यांनतर त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात कार्य केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी काम करताना त्यांनी मोठ्या मेहनतीने पक्ष वाढविला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी कोकणात आणि मुंबईत राणे कुटुंबीयांचा निवडणुकीत जोरदार प्रचार केला. ६ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आणि त्यांची राजकीय वाटचाल अर्ध्यावरच थांबली.

राजकारणात काम करताना सामाजिक क्षेत्राशी बांधिलकी त्यांनी कायम जोपासली. दिवसरात्र जनतेचा कैवारी म्हणून त्यांनी केलेले काम अनेकांच्या स्मरणात राहील. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव म्हणून त्यांनी केलेले कार्य प्रचंड मोठे आहे. ते गावडे – गावडा समाज उत्कर्ष संस्था, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष होते. त्या माध्यमातून त्यांनी समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मिळविण्यासाठी प्रचंड मोठी आंदालने करीत आहे – न्यायालयीन लढाई करीत आहे. त्यासाठी काहींना हौतात्म्य पत्करावं लागलं. परंतु मोहन लोकेगावकर साहेबांनी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाला कोणतेही आंदोलन न करू देता आरक्षण मिळवून दिले. त्याचा लाभ समाजातील लाखो विद्यार्थी आज घेत आहेत आणि भविष्यातही घेतील. अशाप्रकारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजासाठी अभूतपूर्व कार्य मोहन लोकेगावकर साहेबांनी करून ठेवले आहे. त्यामुळे मोहन लोकेगावकर साहेब देहाने जरी आमच्यामध्ये नसले तरी कर्तृत्वाने अमर झाले आहेत. ह्याची जाण आम्ही समाज बांधवांनी निश्चितपणे ठेवली पाहिजे.

“क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई” ह्या संस्थेच्या २५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोहन लोकेगावकर यांनी सभेला अमूल्य मार्गदर्शन केले होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेने सर्वांगीण प्रगती करावी, ह्यासाठी त्यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली होती. अशाप्रकारे ते नेहमीच समाजाच्या भल्याचे विचार मांडायचे.

आज स्वर्गीय मोहन विठोबा लोकेगांवकर यांचा जन्म दिवस! त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवार, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव आणि `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ ह्या संकेतस्थळातर्फे पुन्हा एकदा विनम्र अभिवादन!

-नरेंद्र हडकर / सुरेश डामरे

error: Content is protected !!