नीतिमूल्य जपणाऱ्या वर्तमानपत्रासारखं कार्य करणार!

नीतिमूल्य जपणाऱ्या वर्तमानपत्रासारखं कार्य करणार!

|| हरि ॐ || || श्रीराम || ||अंबज्ञ||

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज हा माझा आहे आणि मी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा आहे!’
मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो आहे तो समाज माझा आहे! हे `माझेपण’ प्रेमातून निर्माण झालेले आहे!
हे `माझेपण’ क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाशी अधिकाअधिक जवळीक निर्माण करते.
हे `माझेपण’ माझ्या मनात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाबद्दल आपुलकी निर्माण करते.
हे `माझेपण’ मला क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करून देते.
हे `माझेपण’ माझ्या मनातील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाबद्दलचा द्वेष संपुष्टात आणते.
हे `माझेपण’ क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील वाईट घटनांवर प्रहार करण्याचे धारिष्ट्य देते आणि समाजातील चांगल्या गोष्टींचा स्वाभिमान बाळगायला शिकविते.

ज्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजामध्ये माझा जन्म झालाय त्या समाजाचे आद्यसंस्थापक शिक्षण महर्षी डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर आहेत, त्या समाजाला ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरी धर्माजी गावकर साहेब यांचे नेतृत्व लाभले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचे काम `समाज माझा’ म्हणजेच `माझेपण’ करतो. ह्या माझेपणातूनच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यसंस्थापक शिक्षण महर्षी डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांचे समाज मंदिर उभे राहिले आणि त्या समाज मंदिराबद्दल आम्हाला हृदयस्थ आस्था आहे.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा `समाज माझा, मी समाजाचा!’ ही एक चळवळ आमच्या मनात-हृदयात स्थिरावते; कारण आम्हाला आमच्या संस्थापकांचा आदर्श माहित आहे. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान आमच्या नेहमीच स्मरणात राहणारे आहे म्हणूनच `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’च्या माध्यमातून सकारात्मक पाऊल टाकण्याचे धाडस क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील प्रत्येक बांधव-भगिनीच्या साथीने आम्ही करावयाचे ठरविले आहे. विधायक विचारांना आणि कार्याला कधीच अपयश येत नाही; यावर आमचा भरवसा आहे. गेली अठरा वर्षे पाक्षिक `स्टार वृत्त’ हे वर्तमानपत्र चालविताना ह्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाला संघटीत करून नावलौकिक मिळवून देणारे आणि सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवणारे डॉ. शिरोडकर आणि एच. डी. गावकर ह्या दोन महामानवांनी समाजासाठी तन-मन-धन अर्पण करून समर्पण भावनेने जे कार्य केले आहे त्याची सातत्याने उजळणी करीत राहणे आमच्यासाठी आवश्यक ठरते. त्यातून उद्याचा समाज घडणार आहे. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात सुवर्णयुग आणायचे असल्यास आम्हाला त्याची नितांत आवश्यकता आहे. त्याच मार्गाने `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ मार्गक्रमण करण्याचा प्रयास करणार आहे.

क्षात्र म्हणजे तेज! क्षात्र म्हणजे क्षत्रिय संबंधित असणारा क्षत्रिय! क्षत्रिय म्हणजे लढाऊ शूरवीर! वाईट-भ्रष्ट गोष्टींच्या विरोधात लढाई करणारा, नकारात्मकता संपून सकारात्मकता आणणारा योद्धा! समाजातील अज्ञान दूर करुन ज्ञानाला प्रकट करणारा आणि ज्ञानाचा प्रसार करणारा पाईक! अन्याय-अपप्रवृत्ती-भ्रष्ट गैरमार्गाला ठामपणे विरोध करून समाजात सर्व क्षेत्रात उचितता आणणारा क्षात्रधर्म-क्षात्रकुल. अशा क्षात्रकुलातून उत्पन्न होतो तो क्षात्रकुलोत्पन्न!

अशा क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या सकारात्मक तेजस्वी वाटचालीसाठी कशाची आवश्यकता आहे?

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. गोवा राज्यात समाजाची लक्षणिय लोकसंख्या आहे. कर्नाटकमध्येही क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव राहत आहेत. एवढेच नाही तर भारतात-परदेशात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव राहत आहेत. त्या सर्वांना एकत्रित आणून समाजासाठी सकारात्मक व्यासपीठ तयार करायला पाहिजे म्हणून `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ कार्य करणार आहे.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा इतिहास, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या नेत्यांची चरित्र, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील आदर्श व्यक्तिमत्व, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची सकारात्मक चळवळ, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची संस्कृती, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची सामाजिक जडणघडण समजून घेण्यासाठी त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ नितीमूल्य जपणाऱ्या वर्तमानपत्रासारखं कार्य करणार आहे.

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ ही संस्था नसेल तर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे व्यासपीठ असेल! संस्था म्हटले की नोंदणी आली, पदाधिकारी आले, निवडणुका आल्या. कालांतराने ज्या संस्थेत आर्थिक सक्षमता येते ती संस्था ताब्यात घेण्यासाठी चुरस आली. खरे-खोटे आरोप प्रत्यारोप आले. त्यातून होते ते रणकंदन, बेबनाव, अफवा, बदनामी, कटकारस्थान आणि यादवी! मग ती संस्था बदनाम व्हायला वेळ लागत नाही. एवढेच नाहीतर संस्थापकांचे पवित्र-शुद्ध उद्देश संपुष्टात येतात. अशा अनुचित गोष्टी प्रत्येक सेवाभावी संस्थेत घडतातच असं नाही. परंतु आदर्शवत कार्य करणाऱ्या संस्था हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या आहेत आणि गैरकारभार करणाऱ्या संस्थाचं पिक आलंय, म्हणूनच हे टाळून `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ कार्य करणार आहे`.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील अनेक व्यक्ती आज विविध क्षेत्रांमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत. आज अनेक समाज बांधव आपल्या कर्तृत्वाने तळपत आहेत. समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. या सर्वांचा जीवनपट आपण `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ संकेतस्थळावर पाहणार आहोत.

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ ही समाजहिताची चळवळ चालविण्यासाठी संचालक, आधारस्तंभ, कार्यकारी संघटक आणि सभासद असतील. समाजासाठी विधायक कार्याच्या विविध संकल्पना मांडून त्या प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करायचे आहेत.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील १६ वर्षावरील बांधव-भगिनी `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’चे सभासद होऊ शकतात. सभासद बनविण्याचे कार्य कार्यकारी संघटक, आधारस्तंभ यांनी करायचे आहे आणि समाजाच्या भल्यासाठी समर्थपणे पुढे यायचे आहे.

सभासद शुल्क, मासिक वर्गणी, अन्य कोणतीही वर्गणी वगैरे कोणतेही शुल्क सभासद होण्यासाठी घेण्यात येणार नाही. विनाशुल्क कायमस्वरूपी सभासद समाज बांधव-भगिनी होऊ शकतात. फक्त समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आपापल्या कुवतीप्रमाणे साथ देण्यासाठी बांधील असलं पाहिजे.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा `समाज माझा, मी समाजाचा!’ ह्या सकारात्मक चळवळीने `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ निर्माण करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने सभासद होऊन आम्हाला साथ द्यायची आहे; असे आमचे नम्रतापूर्वक आवाहन आहे. आपल्या सूचनांचे-मार्गदर्शनाचे स्वागत आहे.

|| नाथसंविध् ||

-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक- https://kmsamaj.org (क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन)
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’ https://starvrutta.com

error: Content is protected !!