शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणतज्ञ डॉ. अंकुश शंकर गावडे यांना ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली!

शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणतज्ञ डॉ. अंकुश शंकर गावडे यांना ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र व क्षा. म. स. शिक्षण संस्थेच्या ग्रामीण विभागाचे पहिले संचालक, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणतज्ञ डॉ. अंकुश शंकर गावडे यांना ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

आज शिक्षणतज्ज्ञ डॉ.अंकुश शंकर गावडे यांचा ३४ वा स्मृतीदिन. शिक्षणाची गंगा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहोचवणारा शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून कै. डॉ. अंकुश शकंर गावडे हे परिचित होते. सिंधुदुर्ग जिल्हातील शिरोडा येथे ११ जून १९११ रोजी डॉ. अंकुश शंकर गावडे यांचा जन्म झाला.

घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्ह्यातील शिरोडा येथे झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये गेले. तिथूनच ते १९२९ मध्ये मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर राजाराम कॉलेजमधून १९३५ मध्ये ते बी. ए. (ऑनर्स)झाले.

जानेवारी १९३७ ते मे १९४६ अखेर ते मुंबई नगरपालिकेच्या सेवेत होते. हेडक्लार्क म्हणून काम करीत असतानाच ती नोकरी सोडली. शैक्षणिक कार्याला वाहून घेण्याच्या उद्देशाने परळच्या के. एम. एस्. परळ हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले.

मुंबईच्या एस. टी. कॉलेजमधून ते १९४७ मध्ये बी. टी. झाले व मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळविले. त्याचवेळी कै. डॉ. जे. पी. नाईक आणि इतर मंडळी मिळून त्यांनी इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेची स्थापना केली. डॉ. अंकुश शंकर गावडे त्या संस्थेचे रजिस्ट्रार होते.

डॉ. जे. पी. नाईक आणि इतर मित्रमंडळीच्या मदतीने अंकुश गावडे १९४९ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लडला गेले. इंग्लडच्या लिड्स विद्यापीठात टी. डी. साठी गेलेल्या डॉक्टरांनी आपल्या बुध्दिमत्तेने तेथील प्राध्यापकांना एवढे स्तिमित केले की, त्यांनी त्यांना एम. एड. ला प्रवेश दिला. त्यांनी अवघ्या दोन वर्षात शैक्षणिक संस्थांची त्यांनी पाहणी केली. टी. डी. साठी गेलेले डॉक्टर दोनच वर्षात डॉक्टरेट होऊन मार्च १९५१ मध्ये हिंदुस्थानात परतले.

मुंबईत इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्युट मध्ये थोडे दिवस काम केल्यावर ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहचविण्याच्या उद्देशाने त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या गारगोटी गावात जाऊन नवीन ग्रामीण शिक्षणाचे प्रयोग सुरू केले. त्यावेळी तेथे मौनी विद्यापीठाची स्थापना झाली. त्या मौनी ग्रामीण विद्यापीठाचे ते पहिले संचालक होते. गारगोटी परिसरात दररोज १०-१२ मैल भ्रमंती करून ९७ खेड्यांचा शोधक मागोवा त्यांनी घेतला. त्या परिसरात प्राथमिक शाळांचे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे एक जाळेच विणले. तेथे त्यांनी ४७ व्हॉलेंटरी प्रायमरी शाळा आणि २१ को. ऑपरेटीव्ह सोसायट्या सुरू केल्या. श्रमदानाने रस्ते तयार केले. हाफ पॅन्ट व शर्ट घालून खेडूतांबरोबर राबणारे डॉ. गावडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटे.

बेडी गावातील धनगरांना पोटासाठी भटकंती व भटकंतीमुळे शिक्षण नाही; हे जाणून डॉ. गावडे यांनी सरकारकडून ६० एकर जमीन कसण्यासाठी मिळविली. भटक्या धनगरांचे पुनर्वसन करून त्यांना जमीन मालक बनविले. मग तेथे धनगरांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली.

१९५५ ते १९६० या काळात डॉ. गावडेंची कर्मभूमी कोकणातील मिठबांव हे गाव. गावासाठी लायब्ररी, गावकऱ्यांच्या सोयीसाठी श्रमदानाद्वारे रूग्णालय, शाळा व रस्ते, सहकारी सोसायट्या, खाऱ्या जमिनीचा विकास, फळबागा असे विविधांगी कार्य जनसेवेचे कंकण बांधण्याचे काम डॉ. श्री. गावडेंनी केले.
१९६० मध्ये मुंबईत आल्यावर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. फाटक, लोके, जेठे, अशा पहिल्या चौदा विश्वासु शिलेदारांना सोबत घेऊन त्यांनी कामगारांच्या मुलांसाठी घाटकोपर पंतनगर मध्ये तांत्रिक शाळा सुरु केली. . दलित, कामगार व गोरगरिबांच्या मुलांसाठी घाटकोपर येथील पंतनगर औद्यौगिक कामगार वसाहतीतील मल्टिपरपज टेक्निकल हायस्कूल सुरू केले.

कित्येकदा कुटुंबाकडे दुर्लक्ष, पैशाची चणचण तरीही कार्याशी एकरूप होऊन खऱ्या अर्थाने कर्मवीर ठरलेले डॉ. गावडे नि:स्वार्थ म्हणजे काय ते डॉक्टरांकडे पहावे. माणूस जोडणारा, घडवणारा, संस्थेसाठी भिक्षांदेही करणारा म्हणजे डॉ. गावडे गुरूवर्य डॉ. रा. का. शिरोडकर, वि. स. खांडेकर, जे. पी. नाईक यांच्याकडून घेतलेला समाजशिक्षणाचा वसा चालवणारे डॉ. गावडे १३ एप्रिल १९८८ मध्ये परमेश्वरचरणी विलीन झाले. आजच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन!

error: Content is protected !!